मुंबई : मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शानदार द्विशतक झळकावलं. ब्रेबॉर्नवरील या तीन दिवसीय सराव सामन्यात श्रेयसनं भारत अ संघासाठी नाबाद 202 धावांची खेळी केली.


श्रेयसच्या या 210 चेंडूंमधल्या खेळीमध्ये 27 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. श्रेयसनं कृष्णप्पा गौतमसह सातव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळंच भारत अ संघाला पहिल्या डावात 403 धावांची मजल मारता आली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 469 तर दुसऱ्या डावात 110 धावा केल्या. त्यामुळं हा सामना अपेक्षेप्रमाणेच अनिर्णित राहिला. मात्र त्यातल्या शानदार खेळीसह श्रेयसनं पुन्हा बीसीसीआयच्या निवड समितीचं दार ठोठावलं आहे.

श्रेयसनं याआधी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातही 100 धावांची खेळी केली होती.