मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 114 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी व्यक्त केला आहे. तर तेवढ्या जागा जिंकण्यात भाजपला अपयश आल्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार आपल्या पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आशिष शेलार यांनी भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच 114 जागांवर भाजपला यश मिळेल, असा दावाही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेला किती जागा मिळतील हे घोषित करावं, असं आव्हानही दिलं आहे.
तसेच शिवसेना नेते अनिल देसाई, सुभाष देसाई, अनिल परब जनतेतून निवडून आले नाहीत, खासदार राहुल शेवाळे हे देखील मोदींमुळे निवडणून आले आहेत, त्यामुळे ज्यांना युती विना जनसमर्थन नसलेल्यांची पोपटपंची सुरु आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी सेना नेत्यांना लगावला.
आशिष शेलारांच्या या दाव्याला उत्तर देताना, जर भाजपला 114 जागांवर यश मिळालं नाही, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी विचारला आहे.