मुंबई : ‘बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला.’ अशी थेट मागणी कसोटीवीर संदीप पाटील यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी बॉल टॅम्परिंगविषयीही बरीच माहिती दिली.

नुकत्याच समोर आलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात बरीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया असेच प्रकार करुन जिंकत आलं का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

नेमकं काय म्हणाले संदीप पाटील?

‘47 वर्ष धुमाकूळ घातलेल्या या चोरांना पकडण्यात आज आयसीसीला यश आलं आहे. 47 वर्ष याकरता म्हणालो की, 70 सालापासून जेव्हा इयान चॅपल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता त्याने या सर्व गोष्टींना सुरुवात केली होती. त्यामुळे बॉल टेम्परिंग याला ऑस्ट्रेलियाचे खेळाडूच कारणीभूत आहेत. या सगळ्या गोष्टी आयसीसीला आज नाही तर अनेक वर्षापासून माहिती आहेत. पण त्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं होते. ते आयसीसीकडून उचलले गेले नाही. पण आता खुद्द स्टिव्ह स्मिथने जेव्हा बॉल टॅम्परिंग मान्य केलं तेव्हा आयसीसी खडबडून जागं झालं.’ असं पाटील म्हणाले.

‘ज्याप्रमाणे आपल्या बोर्डाने देशी खेळाडूंवर कठोर कारवाई केली त्याप्रमाणे कठोर कारवाई आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर झाली पाहिजे. पण मी तर म्हणेन स्मिथवर आजीवन बंदी घातली गेली पाहिजे. फक्त त्याच्यावरच नाही तर त्याच्या सोबत जे कोणी असतील त्यांच्यावर देखील बंदी घातली गेली पाहिजे. आयसीसीकडे पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की, आशियाई खेळाडूंवर जास्त कारवाई झाली आहे. पण इंग्लंड,ऑस्ट्रेलिया यांच्यावर फार कारवाई होत नाही. हे बरोबर नाही. पण बॉल टॅम्परिंगमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू पुढे असतात. हा फारच गंभीर गुन्हा आहे. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर आजन्म बंदी घालणं गरजेचं आहे.’ असं संदीप पाटील यावेळी म्हणाले.

VIDEO :



बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?

बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो. सांगायचंच झालं तर मातीनं, बाटलीच्या बुचानं किंवा कोणत्याही चीजवस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूंवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिन्ट किंवा च्युईंगगम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं, व्हॅसेलिन किंवा तत्सम पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात.

संबंधित बातम्या :

व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास


चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद


तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल


स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!


'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं 


क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना


स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई