मुंबई : इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज खुद्द शोएब अख्तरने विश्वचषकावर भारताने नाव कोरण्याची इश्चा व्यक्त केली आहे.  तसेच आशियाखंडातील देशानेच विश्वचषकावर बाजी मारावी असं अख्तरने म्हटलं आहे.


"सामन्यात न्यूझीलंड दबाव झेलू शकत नाही. मला आशा आहे की यावेळी न्यूझीलंड चोकर्स सिद्ध होणार नाहीत. खरं तर मला विश्वचषक उप-महाद्वीपमध्ये येण्याची इच्छा आहे आणि त्यासाठीच मी भारताचं समर्थन करणार आहे", असं मतं शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन मांडलं आहे.

"रोहित शर्माने आतापर्यंत आठ सामन्यात पाच शतके ठोकली आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध 103 धावांची शतकी खेळी केली. रोहितची अचूक वेळ आणि उत्तम फटके निवड उत्तम आहे. खेळाबदद्ल त्याचा समज विलक्षण आहे. तसेच राहुलनेही श्रीलंकेच्या विरुद्ध शतक पूर्ण केले असून ही एक चांगली बाजू आहे." असंही शोएब अख्तर म्हणाला.

दरम्यान विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. हा सामना नऊ जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येईल. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 11 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात यजमान इंग्लंडचा मुकाबला त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी होईल.

सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा यंदाच्या विश्वचषकातला सातवा विजय ठरला.

सात सामन्यातील विजय (14 गुण) आणि एका रद्द सामन्यामधून मिळालेला 1 गुण मिळून 15 गुणांसह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर 5 विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने 11 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

दरम्यान नऊ सामन्यांपैकी सात विजयांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाने सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार आहे.

संबंधित बातम्या

World Cup 2019 | तब्बल 11 वर्षानंतर विराट आणि विल्यमसन विश्वचषकात पुन्हा भिडणार 

World Cup 2019 : गुणतालिकेत भारत टॉपवर : मंगळवारी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार

World Cup 2019 : भारताच्या पराभवाने शोएब अख्तर निराश, विजयासाठीच्या प्रार्थना कामी न आल्याची खंत