लंडन : श्रीलंकेला पराभवाची धुळ चारत टीम इंडियाने मोठ्या दिमाखात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बाद फेरीनंतर टीम इंडिया गुण तालिकेत अव्वल स्थानी आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना येत्या 9 जुलै रोजी न्यूझीलंडशी होणार आहे.


बाद फेरीच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषकातील आपला शेवट गोड केला. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडतील, असा दावा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने केला आहे. तसेच अंतिम सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करणार असल्याचं डू प्लेसिसने म्हटलं आहे.



टीम इंडिया उपांत्य फेरीत जिंकल्यास आनंद होईल, असं डू प्लेसिसने म्हटलं. कारण न्यूझीलंडची कामगिरी गेल्या तीन सामन्यामध्ये खालावली आहे. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल, असा अंदाजही डू प्लेसिसने वर्तवला आहे.


भारताला आमच्या विजयामुळे आनंद झाला असेल. कारण उपांत्य फेरीत ते आता न्यूझीलंडशी भिडणार आहेत. मात्र न्यूझीलंडचं गेल्या तीन सामन्यातील प्रदर्शन खास नव्हतं, याचा फायदा टीम इंडियाला होईल. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे मी या दोन्ही संघांना सपोर्ट करणार असल्याचं फाफ डू प्लेसिसने म्हटलं.