मुंबई : भारताचा स्टार खेळाडू शिखर धवन गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद या संघाकडून खेळत आहे. परंतु त्याचा हैदराबादच्या संघासोबतचा प्रवास आता संपणार आहे. शिखर धवन आयपीएलच्या येत्या सीझनमध्ये हैदराबादकडून खेळणार नाही. शिखर पुढील वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीच्या संघाने आयपीएल २०१९ पूर्वी प्लेअर स्वाईपनुसार धवनच्या बदल्यात विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाद नदीम हे खेळाडू सनरायजर्सच्या संघाकडे सोपवले आहेत.

बॅक टू होम


११ वर्षांपूर्वी धवनने दिल्लीच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे धवन आता त्याच्या जुन्या संघात परतणार आहे. धवनला आपल्या संघात घेण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघमालकांमध्ये स्पर्धा रंगली होती. अखेर शिखर धवनला आपल्या संघात घेण्यात दिल्लीच्या संघाला यश मिळाले.


२०१८ साली धवनचा सनरायजर्स हैदराबादच्या संघाने ५.२ कोटी रुपयांच्या किंमतीमध्ये आरटीएमद्वारे (राइट टू मॅच) आपल्या संघात समावेश केला होता. परंतु धवन या किंमतीमध्ये खूश नसल्याने त्याला हैदराबादचा संघ सोडायचा होता, असे बोलले जात आहे. धवनच्या बदल्यात दिल्लीच्या संघाने विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीम हे खेळाडू रिलीज केले आहेत. दिल्लीच्या संघ मालकांनी गेल्या वर्षी ऑल राऊंडर विजय शंकर याला ३.२ कोटी, शाहबाज नदीन याला ३.२ कोटी आणि अभिषेक शर्माला ५५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. या तीनही खेळाडुंना रिलीज केल्यानंतर दिल्लीच्या वॉलेटमध्ये ६.९५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे धवनला दिल्लीच्या संघाने खरेदी केले.