मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा टी20 सामना आज लखनौच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. वनडे मालिका विजयानंतर टीम इंडिया आता टी20 मालिकेवरही वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाली आहे.


टीम इंडियानं कोलकात्याचा टी20 सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता लखनौचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिल. या सामन्याचा विचार केल्यास वेस्ट इंडिजपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे दिसत आहे.

नव्याने बांधलेल्या लखनौमधील इकाना स्टेडियममध्ये आज पहिलाच सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल, त्याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. टी20 क्रिकेट हे फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते, पण लखनौच्या खेळपट्टीवर धावांची बरसात कमी होईल, असे क्युरेटरचे म्हणणे आहे. या खेळपट्टीवर खेळण्याचा दोन्ही संघांना अनुभव नसला तरी सामन्यात कोण वर्चस्व गाजवतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तत्पूर्वी भारतानं कोलकात्याच्या पहिल्या टी20 सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवला. पण या विजयासाठी टीम इंडियाला कठोर संघर्ष करायला लागला. कुलदीप यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रभावी मारा करुन विंडीजला स्वस्तात रोखलं होतं. पण प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळं टीम इंडियाला विजयी लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.

वेस्ट इंडिज : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, ओबेड मॅककॉय, कीमो पॉल, खारी पाएरे, किरॉन पोलार्ड, निकोलस, पूरन, रोवमन पॉवेल, दिनेश रामदीन, शेर्फने रुदरफोर्ड, ओशेन थॉमस.