नवी दिल्ली : भारत अरुण यांची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समर्थन केलं आहे. झहीर खान आणि भरत अरुण यांची तुलना करणं चुकीचं आहे, असं म्हणत रवी शास्त्रींनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


झहीर खान एक उत्तम गोलंदाज असल्याचं सांगत रवी शास्त्री यांनी भारत अरुणचा बचाव केला. चांगला प्रशिक्षक कोण असेल, हा महत्वाचा मुद्दा होता, असं रवी शास्त्री म्हणाले.

झहीर खान आणि भारत अरुण यांची एक गोलंदाज म्हणून तुलना करु नये. उलट प्रशिक्षक म्हणून भारत अरुण यांची कामगिरी कशी आहे, हे पहावं, असंही रवी शास्त्रींनी सांगितलं.

भारत अरुण यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 80 पैकी 77 वेळा सर्व विकेट्स घेतल्या आहेत, असा दाखला देत ते चांगले प्रशिक्षक ठरतील, असा दावा केला.

अनिल कुंबळे आणि माझ्यासारखे अनेक प्रशिक्षक येतील आणि जातीलही, पण टीम इंडियाच खरी नायक आहे आणि टीम इंडियालाच प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट मिळायला हवं, असंही रवी शास्त्री म्हणाले.

रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारत अरुण यांची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. परदेश दौऱ्यांसाठी झहीर खानचीही गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नंतर भारत अरुण यांचंच नाव निश्चित करण्यात आलं.