मुंबई : ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त महान फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नचं आगामी पुस्तक ‘नो स्पिन’मध्ये ड्रेसिंग रुममधील मोठ्या घटनांचा खुलासा करण्यात आला आहे. वॉर्नने या पुस्तकात स्टीव्ह वॉला सर्वात ‘स्वार्थी क्रिकेटर’ म्हटलं आहे. शिवाय ‘बॅगी कॅप’ (ऑस्ट्रेलिया संघाची टोपी) विषयी अंधभक्ती करण्याचीही आपल्याला चीड होती, असं त्याने म्हटलं आहे.


या पुस्तकातील काही भाग ‘द टाइम्स’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये हे खुलासे आणि दाव्यांबाबत सांगण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची जेवढी पुजा केली जाते, ज्यामध्ये जस्टिन लँगर, मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलख्रिस्ट यांचाविषयी देखील खुप श्रद्धा होती. पण माझ्याविषयी तसं नव्हतं, असं वॉर्नने म्हटलं आहे.

“त्यांना संघ खुप आवडायचा, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ते मला कमी दाखवायचे. मला हे म्हणायचंय, की विम्बल्डनमध्ये संघाची कॅप कुणी घालेल का? हे शरमेने मान खाली घालायला लावणारं आहे. मार्क वॉलाही असंच वाटायचं. मला हे सिद्ध करण्यासाठी ‘बॅगी ग्रीन’ कॅपची गरज नव्हती, की माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून खेळणं किती महत्त्वाचं आहे किंवा आम्हाला पाहणाऱ्या लोकांसाठी हे किती महत्त्वाचं आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे.

कुठेही गेल्यानंतर संघाची कॅप घालणं फार महत्त्वाचं नाही, पण काही खेळाडू सतत ही कॅप घालून फिरायचे, असं या पुस्तकातून वॉर्नने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

स्टीव्ह वॉबाबतही वॉर्नने या पुस्तकात लिहिलं आहे. फॉर्मात नसल्याचा हवाला देत वॉर्नला 1999 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आलं होतं, तेव्हा आपल्या कर्णधाराचं समर्थन न मिळाल्यामुळे आपल्याला कमी दाखवलं गेल्यासारखं वॉर्नला वाटलं होतं.

त्या घटनेचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. ''मी उपकर्णधार होतो आणि एक गोलंदाज म्हणून संघात होतो. टुगा (वॉ) ने निवडीच्या बैठकीला सुरुवात केली आणि प्रशिक्षक ज्येफ मार्श म्हणाले, 'वॉर्नी, मला नाही वाटत की तू पुढच्या कसोटीत खेळावं”

वॉर्न पुढे म्हणतो, “शांतता पसरली, मग मी विचारलं का? मग उत्तर मिळालं, ‘मला नाही वाटत, की तू चांगली गोलंदाजी करतोयस.’ मग मी म्हणालो, ‘हा, योग्य निर्णय आहे.’ पुन्हा मी सांगितलं, ‘माझा खांदा सर्जरीनंतर जास्त वेळ घेत आहे, एवढा वेळ घेईल असं वाटलं नव्हतं, पण मी लवकरच पुनरागमन करेन, फॉर्म हळूहळू परत येत आहे आणि लवकरच लय मिळेल. मला याची चिंता नाही” असा किस्सा वॉर्नने पुस्तकात लिहिला आहे.

“निराशा हा जास्त कठोर शब्द नाही. पण जेव्हा कठीण परिस्थिती आली तेव्हा टुगाने माझं समर्थन केलं नाही आणि त्याने मला खजिल केलं, ज्याचं मी एवढं समर्थन केलं होतं आणि तो माझा चांगला मित्रही होता”, असं म्हणत वॉवर वॉर्नने ताशेरे ओढले आहेत.

कर्णधार झाल्यानंतर वॉची भूमिका एकदमच बदलली होती, असं सांगण्याचा प्रयत्न वॉर्नने यातून केला आहे. वॉर्न पुढे लिहितो, “माझ्या कामगिरी व्यतिरिक्त इतरही घटना घडल्या होत्या. मला वाटतं की ही चढाओढ होती. त्याने मला माझ्या प्रत्येक गोष्टीवर टोकणं सुरु केलं. मला माझी डाएट पाहायला सांगितली आणि असं म्हणाला की, ‘तू या गोष्टीवर लक्ष दे, की तू जीवनात चांगला व्यक्ती कसा बनशील’. मग मी त्याला म्हणालो, मित्रा, तू तुझ्या बाबतीत विचार कर”, असा किस्सा वॉर्नने लिहिला आहे.

वॉर्नच्या या पुस्तकातील काही भागानेच क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. एकेकाळी क्रिकेटवर कायम वर्चस्व गाजवणाऱ्या संघातील अशा गोष्टी समोर आल्याने जगभरात विविध चर्चा होत आहेत. विरोधी संघाची स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही नेहमी ‘ऑल इज वेल’ नव्हतं, हे यानिमित्ताने समोर आलं आहे.