मुंबई : सर्व भारतीयांना इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल)12 व्या सीझनची प्रतीक्षा आहे. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी परदेशी खेळाडू भारतात दाखल होऊ लागले आहेत. नुकताच भारतात दाखल झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नने आयपीएलच्या यंदाच्या विजेत्याबाबत भविष्यवाणी केली आहे. शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

आयपीएलचा सीझन सुरु होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने दोन मोठ्या भविष्यवाणी केल्या आहेत. त्यामध्ये त्याने यंदाच्या आयपीएलचा विजेता कोण होणार? तसेच यंदाच्या हंगामात कोणता खेळाडू मालिकावीर होईल याबाबत अंदाज वर्तवला आहे.

शेन वॉर्नने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स संघाला पाठिंबा दर्शवला आहे. हाच संघ यंदाचा आयपीएल चषक पटकावेल अशी खात्रीदेखील त्याने व्यक्त केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने यंदाच्या मोसमात संजू सॅमसन हा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावेल असे म्हटले आहे.