कोलंबो : कोलंबोतील टी-20 तिरंगी मालिकेत बांगलादेशनं श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला. सामन्यात प्रचंड चढउतारही पाहायला मिळाले. पण यावेळी मैदानातच दोन्ही संघातील खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळलं. सुरु असलेल्या सामन्यातच बांगलादेशच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवलं.




सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्यानं नो बॉल असल्याचं सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे खेळ काही काळ थांबला.


यावेळी शाकीबनं फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये परतण्याच्या सूचना केल्या. पण त्यानंतर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हस्तक्षेप करत सामना पुन्हा सुरु केला. मात्र सामना संपल्यावरही बांगलादेशी आणि श्रीलंकनं खेळाडूंची बाचाबाची झाली. यावेळी बांगलादेशचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि पंचांनी खेळाडूंना शांत केलं.

या एकूण प्रकरणामुळे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड आणि आयसीसीकडून संबंधित खेळाडूंवर कारवाईची होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :
बांगलादेशचा श्रीलंकेवर थरारक विजय, फायनलमध्ये धडक