चेन्नई : ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजाने अखेरच्या फटकावलेल्या 19 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या रणांगणात सलग दुसरा सनसनाटी विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून पराभव केला.

विजयासाठी कोलकात्याने चेन्नईसमोर 202 धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केलं. या पराभवानंतरही कोलकात्याचा सहमालक शाहरुख खान खेळाडूंसोबत डान्स करताना दिसून आला.

शाहरुखसोबत ऑलराऊंडर खेळाडू आंद्रे रसेल, सुनील नारायण, शुभमन गिल आणि कमलेश नागरकोटी हे खेळाडूही थिरकले. आंद्रे रसेलने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


चेन्नईच्या या विजयाचा पाया सॅम बिलिंग्सने रचला. त्याने 23 चेंडूंत 53 धावांची खेळी उभारली. मग चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना, ब्राव्हो आणि जाडेजाने कमाल केली.

त्याआधी, आंद्रे रसेलच्या खेळीने कोलकात्याला सहा बाद 202 धावांची मजल मारुन दिली होती. रसेलने या सामन्यात षटकारांचा जणू पाऊस पडला. त्याने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून 11 षटकार आणि एका चौकाराची वसुली केली. त्यामुळे त्याच्या नावावर 36 चेंडूंत नाबाद 88 धावांची खेळी उभी राहिली.