विम्बल्डन: वर्ल्ड नंबर वन सेरेना विल्यम्सच पुन्हा एकदा विम्बल्डनची राणी ठरली आहे. सेरेनानं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरवर 7-5, 6-3 अशी मात केली. सेरेनाचं हे विम्बल्डन महिला एकेरीतलं तब्बल सातवं विजेतेपद ठरलं.


 

या विजयासोबतच सेरेनानं स्टेफी ग्राफच्या ओपन इरामध्ये सर्वाधिक 22 ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधली. सेरेनाच्या खात्यात सात विम्बल्डन विजेतेपदांशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा, फ्रेन्च ओपनमध्ये तीन आणि अमेरिकन ओपनमध्ये सहा विजेतीपदं जमा आहेत.

 

ओपन इरामध्ये म्हणजे 1968नंतर सेरेना आणि स्टेफीलाच 22 ग्रँड स्लॅम जेतेपदं जिंकता आली आहेत. केवळ मार्गारेट कोर्टनंच सेरेना आणि स्टेफीशिवाय जास्त म्हणजे 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदं मिळवलं होती. त्याच मार्गारेटच्या उपस्थितीत सेरेनानं स्टेफीच्या विक्रमाशी बरोबरी साधून महिला टेनिसवरची मक्तेदारी सिद्ध केली आहे.