टेड कॉन्फरन्समध्ये पत्रकार गेल किंगसोबत गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेरेनानं तिच्याशी दिलखुलास बातचीत केली. गरोदरपणाची बातमी शक्य तितके महिने गुप्तच ठेवण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्याच अनवधानानं बिकिनीतला तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि ती बातमी फुटली असं सेरेनानं सांगितलं.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोनच दिवसआधी आपण गरोदर असल्याचं कळल्याची कबुलीही तिनं दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायचं की, नाही याबाबत मी द्विधा मनस्थितीत होते, असंही सेरेना म्हणाली. माझं खेळणं बाळासाठी धोकादायक ठरु शकलं असतं, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. शक्य तितका ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न केल्याचंही सेरेनाने स्पष्ट केलं.
टेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गुड न्यूज
35 वर्षीय सेरेनानं स्नॅपचॅटवर फोटो पोस्ट करुन त्याखाली 20 वीक्स असं कॅप्शन दिलं होतं. मात्र ही पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'रेडिट' या वेबसाईटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत सेरेनाचा साखरपुडा झाला होता.
जानेवारी महिन्यात सेरेनानं बहीण व्हीनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली आहे. सेरेना आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याचा मान मिळवला आहे.