नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी आज (रविवार) भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाची कमकुवत बाजू मानली जाते. त्यामुळे टीम इंडियात सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये व्यस्त असलेल्या रवीचंद्रन अश्विनची निवड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अश्विनने काऊंटी क्रिकेटमध्ये चार सामन्यांचा करार केला आहे. ज्यापैकी सध्या दोन सामने खेळवण्यात आले आहेत. दरम्यान सध्या यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल चांगली कामगिरी करत असल्याने अश्विनला काऊंटी क्रिकेटचा अनुभव पूर्ण करुन दिला जाण्याची शक्यता आहे.
संघ निवडीमध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता कमीच आहे. येत्या तीन महिन्यात भारतीय संघ 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 11 वनडे, 9 टी-20 आणि 3 कसोटी सामन्याचा समावेश आहे. या सर्व सामन्यांसाठी निवड समिती भारतीय गोलंदाजीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे. भुवनेश्वर कुमार किंवा जसप्रीत बुमरा यांना विश्रांती दिली तर उमेश यादव किंवा मोहम्मद शमी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये 2019 ला होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून सध्या भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. त्यामुळे निवड समितीकडून रोटेशन पॉलिसीचाही वापर केला जातोय. फिट असणाऱ्या खेळाडूंना संघात जास्तीत जास्त संधी दिली जात आहे.
भारतीय फलंदाजांमध्ये कोणतेही मोठे बदल केले जाण्याची शक्यता नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी आणि ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्याची निवड केली जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघ निवड, कुणाला संधी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2017 12:13 PM (IST)
फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाची कमकुवत बाजू मानली जाते. त्यामुळे टीम इंडियात सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये व्यस्त असलेल्या रवीचंद्रन अश्विनची निवड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -