मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबतचं रहस्य तीन वर्षानंतरही कायम आहे. मात्र सचिनने निवृत्ती घेतली की त्याला घ्यायला लावली, याबाबतचा गौप्यस्फोट खुद्द भारताच्या निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला.

सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतला नसता, तर निवड समितीने त्याला निश्चितच ड्रॉप केलं असतं, असा गौप्यस्फोट निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे. संदीप पाटील यांनी 'माझा कट्टा'वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

23 डिसेंबर 2012 रोजी सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

"12 डिसेंबर 2012 रोजी आम्ही सचिनची भेट घेऊन, तुझी वाटचाल काय असेल, तुझ्या मनात काय आहे, अशी विचारणा केली. माझ्या मनात निवृत्तीचा विचार नाही, असं उत्तर सचिनने त्यावेळी दिलं होतं. पण सचिनबाबत निवड समितीचं एकमत झालं होतं. शिवाय बोर्डालाही याबाबत कळवलं होतं. कदाचित सचिनला इशारा समजला असेल. कारण पुढच्याच मीटिंगला सचिनने कॉल केला आणि निवृत्त होत असल्याचं सांगितलं. सचिनने त्यावेळी निवृत्तीचा निर्णय घेतला नसता, तर निवड समितीने त्याला वन डे संघातून निश्चितच ड्रॉप केलं असतं," असं संदीप पाटील यांनी सांगितलं.

खरंतर सचिनसारख्या खेळाडूला हे सांगावं लागणं, ही गोष्ट मनाला टोचणारी आहे, अशी भावनाही संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

मात्र 200 व्या कसोटीनंतर निवृत्त होणं हा सर्वस्वी निर्णय सचिनचाच होता, असंही पाटील यांनी नमूद केलं.

वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केली जाते, त्यांना का वगळलं याची कारणं सांगितली जातात. निवड समिती खेळाडूला ड्रॉप करु शकते. मात्र 'थांब' हे सांगू शकत नाही. पण संघात स्थान मिळालं नाही तरी बोर्डाचे दार कायमच उघडे आहेत, असंही खेळाडूंना सांगितल्याचं संदीप पाटील म्हणाले.

मास्टर ब्लास्टरचा विक्रम

सचिन तेंडुलकरने 18 डिसेंबर, 1989 रोजी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18,426 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक 463 वन डे सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. सचिनने एकूण 463 वन डे सामन्यात 49 शतकं आणि 96 अर्धशतक ठोकली आहेत. नाबाद 200 ही सचिनची वन डेमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

पाहा व्हिडीओ