मुंबई: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला कोलकाता कसोटीमधील दुसऱ्या खेळीत डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. धवनाची जखम गंभीर असल्याने, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यावर कोलकाता कसोटीची क्रिकेट कॉमेंट्र करणाऱ्या सेहवागने त्यातही ह्यूमर शोधला आहे.
शिखर धवन न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर दुखापत ग्रस्त झाला. धवनच्या दुखापतीवर सेहवागने शिखर धवन आणि गंभीरला चिमटे काढले. तो म्हणाला की,''चला, लोकेश राहुलनंतर शिखर धवनही दुखापतग्रस्त झाला. तेव्हा आगामी कसोटी सामन्यात माझा मित्र गौतम गंभीरला खेळायला मिळेल.''
कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये राहुलने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले. त्यामुळे गौतम गंभीरचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला. मात्र, कोलकाता कसोटीत त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
दरम्यान, कोलकाता आणि कानपूर कसोटीमध्ये शिखर धवनने समाधानकारक कामगिरी केली नव्हती, त्यातच तो कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या खेळीत डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.