मुंबई : कसोटी, वन डे आणि टी-20 नंतर आता क्रिकेटमध्ये टी-10 या नव्या फॉरमॅटची सुरुवात होत आहे. स्पोर्ट्सवाला वेबसाईटच्या वृत्तानुसार लवकरच 10-10 लीगची सुरुवात होणार आहे. यूएईची टी-टेन स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी आणि अमीरात क्रिकेट बोर्डाने या नव्या लीगची घोषणा केली आहे.


या लीगची सुरुवात शरजाह इथे होणार आहे. मालिकेतील सर्व सामने 10 षटकांचे होतील आणि केवळ 90 मिनिटात सामना पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 षटकांचा सामना होणारी ही पहिलीच लीग असेल.

दक्षिण आशियाई संघ या लीगमध्ये असतील, ज्यांची नावं पंजाबी, पठाणकोट, मराठा, बंगाल, लंकन्स, सिंधी आणि केरलाटीस असे असू शकतात.

पहिल्या मोसमात 6 संघांचा समावेश असेल. लीगची सुरुवात 21 सप्टेंबर 2017 रोजी होईल आणि चार दिवसात या लीगचा समारोप होईल. याची विशेषता म्हणजे केवळ चार दिवसात लीगचा विजेता संघ ठरणार आहे. लिलावाच्या माध्यमातून संघांमध्ये खेळाडूंचा समावेश केला जाईल.

लीगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असेल. वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेलची या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर टीम इंडियाचा माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचाही या लीगमध्ये सहभाग असेल. शाहीद आफ्रिदीकडे या लीगमधील एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.