नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या टी-20 संघातील समावेशावर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग धोनीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

भारतीय संघाला सध्या धोनीची गरज आहे. धोनी युवा खेळाडूंचा संघात येण्याचा मार्ग कधीही बंद होऊ देणार नाही. योग्य वेळी तो निर्णय घेईल, असं सेहवाग म्हणाला. ‘इंडिया टीव्ही’शी तो बोलत होता. टी-20 संघात धोनीऐवजी युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी, असं मत लक्ष्मणने व्यक्त केलं होतं.

दरम्यान सेहवागने धोनीला सल्लाही दिला आहे. त्याने संघातील त्याची भूमिका स्पष्ट करायला हवी. आव्हानाचा पाठलाग करताना खेळण्याच्या शैलीत त्याने बदल करायला हवा. पहिल्या चेंडूपासूनच धावांची जुळवाजुळव त्याने करायली हवी आणि व्यवस्थापनाने त्याच्या हा मुद्दा लक्षात आणून द्यावा, असं सेहवाग म्हणाला.

संघ व्यवस्थापनाने त्याला हे समजून द्यावं की, तू पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ कर. बाद झाला तरीही किमान आक्रमक खेळत राहशील, हे संघ व्यवस्थापनाने त्याच्या लक्षात आणून द्यावं, असं सेहवाग म्हणाला.

राजकोटमधील सामन्यात धोनीने विराट कोहलीच्या साथीने 44 चेंडूंत 56 धावांची भागीदारी रचून भारतीय डाव सावरला. धोनीने 37 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 49 धावांची खेळीही उभारली. पण विजयासाठी वीस षटकांत 197 धावांचं आव्हान समोर असताना धोनी-विराटची भागीदारी आणि धोनीची खेळीही तुलनेत संथ भासली. धोनीच्या दोन चौकार आणि तीन षटकारांचा अपवाद वगळला, तर त्याने उर्वरित 32 चेंडूंत मिळून केवळ 23 धावांचीच वसुली केली.