कर्णधार मिताली राजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सात विकेट्सनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारतीय महिलांनी 19 व्या षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.
सलामीला आलेल्या मिताली राजने 48 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 54 धावांची खेळी केली. मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जने पदार्पणाच्या सामन्यात 37 धावांची खेळी करत लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आलेल्या वेदा कृष्णमूर्तीनेही नाबाद 37 धावांचं योगदान देऊन टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार वार्न नीकर्क (38), क्लो टायरन (नाबाद 32) आणि मिगनोज डु प्रीज (31) यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 164 धावा केल्या होत्या.
दुसरा टी-20 सामना 16 फेब्रुवारी रोजी ईस्ट लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहे.