मुंबई : आयपीएलमधील कालच्या (रविवार) सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून 7 विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात राजस्थाननं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात मुंबईपेक्षा सरस कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला.

राजस्थाननं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण त्यासोबत क्षेत्ररक्षकांनीही तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केलं. यावेळी मैदानावर अनेक चांगले झेलही पाहायला मिळाले. पण संजू सॅमसनच्या एका झेलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हा झेल अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता.


36 धावांवर खेळणारा पांड्याने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. त्यामुळे चेंडू सीमारेषेपार जाईल असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण याचवेळी संजू सॅमसननं प्रचंड वेगाने धावत येत हवेत सूर मारुन झेल एका हातात पकडला.

हा झेल पाहून स्वत: पांड्याही आवाक् झाला. गोलंदाज बेन स्टोक्सला देखील याचं आश्चर्य वाटलं. संजूचा हा झेल या मौसमातील सर्वोत्कृष्ट कॅचपैकी एक असल्याचं समलोचकही त्यावेळी म्हणाले.