पुणे: दिल्लीच्या संजू सॅमसननं पुण्यात झळकावलेलं शतक यंदाच्या आयपीएल मोसमातलं पहिलं शतक आहेच, पण सॅमसनच्या ट्वेन्टी20 कारकीर्दीतलंही हे पहिलंच शतक ठरलं. संजूनं 62 चेंडूमध्ये शतक ठोकलं. तसंच संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
संजूनं वयाच्या 23व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी 2009 साली आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात मनीष पांडेनं वयाच्या 20व्या वर्षी शतक ठोकलं होतं. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा संजू सॅमसन हा बारावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
सॅमसनच्या त्या शतकाला ख्रिस मॉरिसच्या नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीची जोड लाभली. त्यामुळंच रायझिंग पुणेविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला 20 षटकांत चार बाद 205 धावांची मजल मारता आली.
संजू सॅमसननं 63 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 102 धावांची खेळी उभारली. ख्रिस मॉरिसनं नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांची उधळण केली.