ऑस्ट्रेलिया ओपनच्या मिश्र दुहेरीत सानियाचं ग्रँड स्लॅम जेतेपद हुकलं
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2017 10:42 AM (IST)
मुंबई : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागत आहे. सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान डॉडिग या जोडीला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सानियाला विजेतेपद मिळालं असतं, तर हे तिचं कारकीर्दीतलं सातवं ग्रँड स्लॅम जेतेपद ठरलं असतं. मात्र सानिया आणि डॉडिगला अमेरिकेची अॅबिगेल स्पिअर्स आणि कोलंबियाच्या युआन सबॅस्टियन काबाल यांच्याकडून 6-2, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. रविवारी रॉड लेव्हर अरेनात हा सामना खेळवला गेला. सानिया आणि इवान जोडीनं उपांत्य फेरीत समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ या ऑस्ट्रेलियाच्या जोडीवर 6-4, 2-6, 10-5 असा विजय मिळवला. सानियानं याआधी मिश्र दुहेरीत तीन आणि महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम विजेतेपदं मिळवली होती.