मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर रेल्वेवर सीएसटी ते चुनाभट्टी-माहीम दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल.


मध्य रेल्वेवरील कामामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावरील वाहतूक सकाळी 10.59 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत अप स्लोवरुन चालवण्यात येईल. सीएसटीहून डाऊन फास्ट मार्गावरील लोकल गाड्या सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील.

मुंबईत येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान अप स्लोवरुन चालवण्यात येतील. या गाड्या वीस मिनिटे उशिराने पोहचतील. त्याचबरोबर दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवापर्यंत चालवण्यात येणार आहे.

हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीममध्ये अप आणि डाऊनवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत ब्लॉक चालेल. सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टीमधील अप आणि डाऊनची वाहतूक बंद राहील.

सीएसटी ते वांद्रे-माहीम दरम्यानची अप आणि डाऊनची वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद असेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला प्लॅटफार्म क्रमांक आठवरुन पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बरचे प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करु शकतात.