मुंबई:  भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सानियानं चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीनं सिनसिनाटी ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला.सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीचं हे पहिलंवहिलं विजेतेपद ठरलं.


 

या विजयामुळं सानियानं महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या.

 

विशेष म्हणजे, सिनसिनाटी ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झानं आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगिसला धूळ चारली. या सामन्यात सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीनं मार्टिना हिंगिस आणि कोको वॅन्देवेग जोडीवर 7-5, 6-4 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.

 

दरम्यान, सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीच्या नावावर तीन ग्रँडस्लॅमसह एकूण 14 विजेतीपदं जमा आहेत. पण गेल्या महिन्यात या दोघींनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.