मुंबई : सांगलीतल्या कडेगावचा पैलवान वैभव रासकर नुकताच मुंबई कामगार केसरी किताबाचा मानकरी ठरला. वैभवला मुंबई कामगार केसरी किताबासह गदा, मानाचा पट्टा आणि 21 हजार रुपये रोख इनाम देण्यात आलं.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मुंबई कामगार केसरी किताबासाठीच्या कुस्ती स्पर्धेचं नुकतंच मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुख्य किताबासाठी झालेल्या कुस्तीत वैभव रासकरने विकास पाटीलवर तांत्रिक गुणांच्या आधारावर विजय मिळवला.
वैभव हा मूळचा कडेगावचा असला तरी तो पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. त्याला अर्जुनवीर काका पवार आणि गोविंद पवार यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
दुसरीकडे कोल्हापूर कुंभी कासरीचा पैलवान विक्रम मोरेने कुमार केसरीचा किताब पटकावला. भोगावती सहकारी साखर कारखानाच्या सरदार बरगे यांच्यातील लढतीत तांत्रिक गुणावर विक्रम मोरेने बाजी मारली. कुमार केसरी किताबासह 15 हजार रुपये रोख, गदा, मानाचा पट्टा देऊन गौरव करण्यात आला.