मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीतून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर कोलकात्यात सुरु होणाऱ्या मुलाखतीसाठी संदीप पाटील यांना बोलवण्यात आलेलं नाही.


 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, अनिल कुंबळे, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे हीच मंडळी मुलाखतीसाठी पोहचणार आहेत.

 

सध्या संदीप पाटील यांच्याकडे भारतीय संघाच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या मुलाखतीत संदीप पाटील यांना बोलावण्यात आलं नसल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांचा बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत समावेश आहे. या समितीला मुख्य समन्वयक म्हणून माजी सचिव संजय जगदाळे यांची जोड देऊन बीसीसीआयचं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड भारतीय क्रिकेटच्या 'बिग थ्री'वर सोपवली आहे.

 

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी देशविदेशातून तब्बल 57 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बीसीसीआयच्या प्राथमिक निकषांनुसार त्यापैकी केवळ 21 अर्ज वैध ठरले होते. त्यामुळं प्रामुख्यानं या 21 जणांमधूनच टीम इंडियाच्या भावी मुख्य प्रशिक्षकांची निवड होईल.

 

दरम्यान, या समितीचा एक सदस्य सचिन तेंडुलकर सध्या देशाबाहेर आहे. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण बैठकीत सहभागी होऊ, असं आश्वासन सचिननं दिलं आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांच्या समितीला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबतचा आपला अहवाल 22 जूनपर्यंत बीसीसीआयला सादर करायचा आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संदीप पाटील, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.