नवी दिल्ली: हरियाणाच्या संदीपकुमारनं विक्रमी वेळेसह 50 किलोमीटर्स चालण्याच्या राष्ट्रीय विजेतेपद शर्यतीचं सुवर्णपदक जिंकलं. त्यानं तीन तास 55 मिनिटं आणि 59.05 सेकंद या वेळेत ही शर्यत पूर्ण करून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

संदीपकुमारचा आधीची विक्रमी वेळ तीन तास 56 मिनिटं आणि 22 सेकंद अशी होती. 2014 साली चीनमध्ये झालेल्या चालण्याच्या विश्वचषक शर्यतीत संदीपकुमारनं ती विक्रमी वेळ दिली होती.

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय विजेतेपद शर्यतीत दिलेल्या नव्या विक्रमी वेळेनं संदीपकुमारला लंडनमधल्या जागतिक विजेतेपद शर्यतीचं तिकीट मिळवून दिलं आहे. जागतिक शर्यतीसाठी पात्र ठरण्यासाठी संदीपकुमारला किमान चार तास आणि सहा मिनिटांची वेळ देणं आवश्यक होतं.