बंगळुरु : भारताचा माजी कर्णधार आणि अंडर-19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मुलाने राज्यस्तरावरील शालेय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.
राहुल द्रविडचा मुलगा समितनं अंडर-14 स्पर्धेत खेळताना शानदार शतक झळकावलं आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना अंडर-14 बीटीआर कपमध्ये मल्या अदितीकडून खेळताना समितनं विवेकानंद शाळेविरुद्ध तडाखेबंद खेळी केली.
या सामन्यात समितनं 150 धावा झळकावल्या. तर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू सुनील जोशीचा मुलगा आर्यन जोशीनं देखील 154 धावांची तुफानी खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या शतकी भागीच्या जोरावर त्यांच्या संघानं 50 षटकात तब्बल 500 धावांचा डोंगर उभारला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना विवेकानंद शाळेचा संघ अवघ्या 88 धावांवरच बाद झाला. त्यामुळे समितच्या संघानं हा सामना तब्बल 421 धावांनी जिंकला.
राहुल द्रविडच्या मुलानं ही कामगिरी पहिल्यांदाच केलेली नाही. अंडर 14मध्ये याआधीही त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. समितनं दोन वर्षापूर्वीही बंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबकडून 125 धावांची खेळी केली होती. एवढंच नव्हे तर अंडर 12 मध्येही समितनं बऱ्याच धावा करुन सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला होता. तेव्हा त्याने नाबाद 77, 93, 77 धावांच्या खेळी केल्या होत्या.
दरम्यान, सध्या राहुल द्रविड अंडर 19 विश्वचषक संघाच्या सोबत आहे. तर दुसरीकडे सुनील जोशी बांगलादेश क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी आहे.