हैदराबाद : रणवीर सिंह-दीपिका पादूकोण यांच्या लग्नाने सुरु झालेला सेलिब्रिटी जोड्यांच्या लग्नाचा सिलसिला खेळांच्या दुनियेत दाखल झाला. भारताची फुलराणी सायना नेहवाल तिचा मित्र आणि बॅडमिंटनवीर पारुपल्ली कश्यपसोबत एका साध्या कौटुंबिक सोहळ्यात काल विवाहबद्ध झाली. सायना नेहवालने ट्विटरवर दोन फोटो पोस्ट करुन लग्नाची बातमी दिली आहे. 'बेस्ट मॅच ऑफ माय लाईफ' आणि 'जस्ट मॅरिड' एवढंच सायनाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सायना आणि कश्यपच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रविवार, 16 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. सायबराबाद इथल्या रैदुरगाममधील ओरियन विलास या सायनाच्या घरात हा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. सायना आणि कश्यप नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाल्याची माहिती सायनाचे वडील हरवीर सिंह यांनी दिली. दहा वर्षांच्या नात्याला नाव मिळणार, सायना-कश्यप लग्नगाठ बांधणार या विवाहाला मोजून 40 लोक उपस्थित होते. यात सायना आणि कश्यपच्या कुटुंबाचा समावेश होता. शिवाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल ई एस एल नरसिंह यांनीही विवाहाला उपस्थिती लावल्याचं हरवीर सिंह यांनी सांगितलं. सायना नेहवाल वर्षअखेरीस विवाहबंधनात हलक्या निळ्या रंगाचा लेहंगा, दागिनी आणि कमीत कमी मेकअप असा सायना लूक अतिशय सुंदर होता. तर पी कश्यपने गुलाबी कुर्ता आणि पांढरा पायजमा असा पेहराव केला होता. सायना आणि कश्यप जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. परंतु दोघांनी कधीही याला दुजोरा दिला नव्हता.