मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्सच्या जोरावर मुंबईने कूच बेहार अंडर-19 चषकात रेल्वे संघाला पराभूत केलं.
अर्जुनच्या शानदार कामगिरीची या मोसमातील ही तिसरी वेळ आहे. अर्जुन तेंडुलकरने तीन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशविरुद्ध पाच विकेट्स आणि त्यानतंर आसामविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या.
कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानात खेळलेल्या सामन्यात अर्जुनला पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली, पण त्याला यश मिळालं नाही. परंतु दुसऱ्या डावात कमबॅक करताना त्याने 11 षटकात 44 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या.
डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर रेल्वेचा संघ 136 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईचा एक डाव आणि 103 धावांनी विजय झाला.
याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यशवी भूपेंद्र जयसवालच्या द्विशतकामुळे मुंबईने 389 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रेल्वेचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. पहिल्या डावात ए वशिष्ठने 30 धावांच्या मोबदल्यात आठ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या डावात रेल्वेला सुरुवातीलाच दणके देत अर्जुनने चार विकेट्स घेतल्या. यानंतर डावातील नववी विकेट घेऊन आपले पाच विकेट्स पूर्ण केल्या.