मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं बहुमान मिळवून दिलेली १० क्रमांकाची जर्सी यापुढच्या काळात टीम इंडियाच्या एखाद्या शिलेदारानं परिधान केलेली आपल्याला दिसणार नाही. सचिनची ही १० क्रमांकाची जर्सी टीम  इंडियाच्या वन डे आणि ट्वेन्टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून अनधिकृतरित्या निवृत्त करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं समजतं.


सचिन तेंडुलकरनं कारकीर्दीतल्या अधिकाधिक वन डे सामन्यांमध्ये आणि एकमेव ट्वेन्टी२० सामन्यात १० क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये या जर्सीला एक आगळा बहुमान प्राप्त झाला होता. सचिन तेंडुलकर नोव्हेंबर २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मुंबई कसोटीत खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण त्याआधीच त्यानं वन डे आणि ट्वेन्टी२० क्रिकेटलाही रामराम ठोकला होता. मार्च २०१२मध्ये सचिन पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या वन डे सामन्यात खेळला.

त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी मुंबईच्या शार्दूल ठाकूरनं वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० क्रमांकाची जर्सी परिधान केली. ऑगस्ट-सप्टेंबरमधल्या श्रीलंका दौऱ्यातल्या चौथ्या आणि पाचव्या वन डेत तो १० क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता. पण शार्दूलच्या या कृतीनं त्यानं भारतीय क्रिकेटरसिकांची तीव्र नाराजी ओढवून घेतली.

या मंडळींनी सचिनचा अवमान झाल्याच्या भावनेतून शार्दूल आणि बीसीसीआयला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनातला सचिनविषयीचा आदर लक्षात घेऊन, बीसीसीआयनं सचिनची १० क्रमांकाची जर्सी अनधिकृरित्या निवृत्त करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

भारत अ किंवा तत्सम संघातून खेळणारा एखादा खेळाडू १० क्रमांकाची जर्सी परिधान करु शकेल, पण भारताच्या सीनियर संघाकडून म्हणजे टीम इंडियाकडून खेळताना एकही खेळाडू ती जर्सी यापुढच्या काळात परिधान करणार नाही. टीम इंडियातल्या ज्येष्ठ खेळाडूंनीही सचिनविषयीचा आपला आदर दाखवून, १० क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला एकमुखानं मंजुरी दिली असल्याची माहिती आहे.

सचिन तेंडुलकर २०१३ साली आयपीएलमधून निवृत्त झाला, त्याच वेळी मुंबई इंडियन्सनंही त्याची १० क्रमांकाची जर्सी अधिकृतरित्या निवृत्त केली होती. त्यामुळं मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा शिलेदार रोहित शर्मानं सोशल मीडियावर शार्दूल ठाकूरची टिंगल केली होती. त्यानं शार्दूलचं छायाचित्र पोस्ट करून, 'ए भावा, तुझा जर्सी नंबर काय?', असा प्रश्न विचारला होता.

अर्थात शार्दूल ठाकूरनंही श्रीलंका दौऱ्यानंतर वन डेत १० क्रमांकाची जर्सी परिधान करण्याची पुन्हा हिंमत केली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. त्यात शार्दूलला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये तो ५४ क्रमांकाची जर्सी घालून खेळला होता. या प्रकरणात आपला बचाव करताना शार्दूलनं १० हा आपला शुभांक असल्याचं म्हटलं होतं. आपल्या जन्मतारखेची बेरीज १० येत असल्यानं त्या क्रमांकाची जर्सी वापरल्याचं त्यानं मुलाखतीत सांगितलं होतं.

एखाद्या महान खेळाडूचा आदर राखून त्याची जर्सी निवृत्त करण्याचा प्रसंग भारतीय क्रीडाक्षेत्रात पहिल्यांदाच समोर येत असला तरी व्यावसायिक क्लब फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पण आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये दियागो मॅराडोनाचा आदर राखून त्याची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याच्या अर्जेंटिनाच्या योजनेला 'फिफा'ची मंजुरी मिळाली नव्हती. आजच्या जमान्यात मॅराडोनाचा वारसदार अशी ओळख मिळवणारा लायनल मेसी अर्जेंटिनाकडून त्याची १० क्रमांकाची जर्सी घालून खेळत आहे. कुणी सांगावं, भविष्यात प्रतिसचिन असा बहुमान मिळवणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदाराला मानाची १० क्रमांकाची जर्सी बहाल करण्याची मागणी लोकांकडून होऊ शकेल.