मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांचं एक अनोख नातं आहे. क्रिकेटचं नावं घेतलं की प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या तोंडी सचिनचं नाव पहिलं येत. सचिनने काही दिवसांपूर्वी नेट प्रॅक्टिसमधला त्याच्या गोलंदाजीवर विनोद कांबळी फलंदाजी करतानाचा व्हीडिओ ट्वीट केला होता. मात्र सचिनने क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हीत चूक पाहून या व्हिडीओला रिप्लाय म्हणून आयसीसीनं गमतीत सचिन तेंडुलकरसोबत स्टीव्ह बकनर यांचा 'नो बॉल' देतानाचा फोटो ट्वीट केला.


सचिन आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेकदा चुकीच्या अ्म्पायरिंगचा बळी ठरला होता. स्टीव्ह बकनर यांनी अनेकदा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं होते. त्यामुळे आयसीसीने मुद्दाम स्टीव्ह बकनर यांचाच फोटो निवडला असावा. आयसीसीच्या ट्वीटला सचिननेही आपल्या खास अंदाजात रिप्लाय केला. "बरं झालं यावेळी फलंदाजी नाही तर गोलंदाजी करत आहे. मात्र अम्पायरचा निर्णय नेहमी अंतिम असतो", असा सचिनने आयसीसीच्या ट्वीटला रिप्लाय दिला.





सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 34, 357 धावा केल्या आहेत. यामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 तर कसोटीत 15,921 धावा आहेत. या आकडेवारीमुळे आणि क्रिकेटला दिलेल्या योगदानामुळेच सचिनला क्रिकेटचा देव मानलं जातं. सचिनने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी जोडलेला आहे.


कोण आहेत स्टीव्ह बकनर?


स्टीव्ह बकनर वेस्ट इंडिजचे अम्पायर असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अम्पायरिंक करणाऱ्या अम्पायरपैकी एक आहेत. त्यांनी 128 कसोटी आणि 181 एकदिवसीय सामन्यांमध्ये अम्पायरिंग केली आहे. स्टीव्ह बकनर यांनी 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात अम्पायरिंग केली होती. यावरुन त्यांच्या अनुभवाचा अंदाज लावता येऊ शकतो. मार्च 2009 मध्ये त्यांनी अम्पायरिंगमधून निवृत्ती घेतली.