मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला काल (गुरुवार) राज्यसभेत विरोधकांनी ‘राईट टू प्ले’वर बोलण्याची संधीच दिली नाही. मात्र, आज सचिननं आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. सचिननं त्याच्या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंटवरुन राज्यसभेतलं ‘राईट टू प्ले’ विषयावरचं भाषण आपल्या चाहत्यांसमोर मांडलं.


खेळ, फिटनेस आणि आरोग्य या गोष्टी भारतीयांसाठी किती महत्वाच्या आहेत यावर सचिनने आपले विचार मांडले. यावेळी सचिनने अनेक विषयांवर भाष्य केलं.

यावेळी सचिननं क्रिकेटसह देशात खेळाबद्दल कशा पद्धतीचं वातावरण हवं यावरही आपलं मत मांडलं. 'जेव्हा तरुण फिट राहतील तेव्हाच देश स्वस्थ होईलं. असंही सचिन यावेळी म्हणाला. 2020 साली भारत हा जगातील सर्वात तरुण देश असेल. पण भारतातील नागरिक अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत. भारतात तब्बल 7.5 कोटी लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत. तर लठ्ठपणाच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या व्याधींचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे देशांच्या विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येकानं फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.'

'पालकांनी आपल्या मुलांना खेळासाठी देखील उद्युक्त करणं गरजेचं आहे. क्रिकेट हे माझं आयुष्य आहे. माझे वडील हे लेखक होते. पण मला आयुष्यात जे करायचं होतं. त्यासाठी त्यांनी कायम मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मुलांना तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे.' असंही तेंडुलकरनं आवर्जून सांगितलं.

'अनेक खेळाडूंनी भारताला गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवून दिली. पण आपण त्यांचं किती कौतुक करतो? असा सवालही सचिननं यावेळी उपस्थित केलं. यावेळी सचिननं अनेक अशा खेळाडूंचं उदाहरण दिलं ज्यांनी परिस्थितीवर मात करत देशाचं नाव उज्ज्वल केलं.

पाहा सचिनचं संपूर्ण भाषण :