मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 44 वाढदिवस आहे. देशभरातूनच नव्हे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 16 नोव्हेंबर 2013 रोजी निवृत्ती घेतली. त्यादरम्यान तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ब्लॉग लिहून सचिनचं तोंडभरून कौतुक केलं होतं.

क्रिकेटविश्वासतला अढळ तारा म्हणून सचिनची स्तुती केली होती. इतकंच नाही, तर सचिनमुळेच धोनी कर्णधार झाल्याचंही पवारांनी म्हटलं होतं.

विक्रमादित्य क्रिकेटपटू म्हणून सचिन नावाजला गेलाच आहे. पण क्रिकेटला लालित्य आणि नजाकत देणारा जिगरबाज खेळाडू म्हणून सचिनचा ठसा कुणीच पुसू शकणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

याशिवाय धोनीला कर्णधार करण्यामागे सचिनच असल्याचं पवारांनी त्यावेळी स्पष्ट केलं.

पवार म्हणाले होते, "त्याचं असं झालं, भारतीय संघ द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळत होता. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो आणि लंडनलाच होतो. एक दिवस द्रविड माझ्याकडे आला आणि मला त्याने सांगितलं की, मला कर्णधारपदावरून मुक्त करा. कारण कप्तानपदाच्या ताणाचा माझ्या खेळावर परिणाम होतो. मी द्रविडला सांगितलं,कर्णधारपद तुला असं कसं सोडता येईल? लवकरच साऊथ आफ्रिकेमध्ये टी-20 वर्ल्डकप आहे. त्यानंतर वर्षभरात भारतात वर्ल्डकप आहे. अशावेळी तू कर्णधारपद सोडण्याचा विचार करणं योग्य नाही.

तुला कप्तानपदावरून मुक्त केल्यावर ही जबाबदारी कोणावर टाकायची? द्रविडने पुन्हा मुक्त करण्याचा आग्रह केला आणि कप्तानपदी सचिनचं नाव सुचवलं. द्रविडच्या आग्रहाची कल्पना सचिनला देऊन द्रविडने त्याचं नाव कर्णधारपदासाठी सुचविल्याचं मी त्याला सांगितलं. सचिनने लगेचच मला कर्णधारपदासाठी नकार देऊन धोनीची कर्णधारपदी निवड करण्यास सुचवलं".