मुंबई: सचिन तेंडुलकर निवृत्त झाला की, त्याला बीसीसीआयच्या निवड समितीकडून निवृत्त व्हायला सांगण्यात आलं? याविषयी कायमच चर्चा सुरु असते. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या विषयावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.


लिन्कडइन या नेटवर्किंग साइटशी सचिनचा व्यावसायिक करार झाला असून, या साइटवर सचिनचा 'माय सेकंड इनिंग' हा लेख मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.

या लेखात सचिन म्हणतो की, ‘ऑक्टोबर 2013मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स लीगच्या दिल्लीतल्या एका सामन्याच्या दिवशी आपल्या मनात पहिल्यांदा निवृत्तीचा विचार आला. माझ्या क्रिकेट कारकीर्दीतल्या 24 वर्षात माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही जिममध्ये व्यायामानंच झाली होती. पण त्या दिवशी सकाळी मला व्यायामासाठी उठू नये असं वाटलं’, अशी कबुली सचिननं या लेखात दिली आहे.

‘माझी व्यायाम टाळण्याची ती भावना कदाचित आता थांबायला हवं या भावनेची सुरुवात होती का’, असा प्रश्न सचिननं या लेखात विचारला आहे.