Sachin Tendulkar Discharged : भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे.  27 मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय  म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. आज सचिन तेंडुलकरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्याने ट्वीट करत माहिती दिली आहे. 






सचिननं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आताच दवाखान्यातून घरी आलो. सध्या विलगीकरणात राहणार असून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असं सचिननं म्हटलं आहे. त्यानं पुढं म्हटलं आहे की, मी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझी काळजी घेतली. ते खूप कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत आहेत, असं सचिन म्हणाला. 


सचिन तेंडुलकरची 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर 2 एप्रिलला तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला होता की, "माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा."


 



 


कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. तसंच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं सांगितलं होतं. नुकतचं सचिननं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.