जोहान्सबर्ग : टीम इंडियाच्या झुंजार फलंदाजीनं जोहान्सबर्गच्या कसोटीत चुरशीचा नवा रंग भरला आहे. या कसोटीत भारतानं दुसऱ्या डावात २४७ धावांची मजल मारुन, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या दिवसअखेर एक बाद १७ अशी अवस्था झाली आहे.


पण या सामन्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले. द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात बुमराचा एक उसळता चेंडू डीन एल्गरच्या तोंडावर लागल्यानं पंचांनी सामना थांबवला. पण खेळपट्टी खराब असल्यामुळे हा सामना रद्द होणार की शनिवारी सामना पुन्हा खेळवण्यात याबाबत अद्याप तरीही काहीही माहिती समजू शकलेली नाही.

या सामन्यात खेळपट्टीवर बराच कमी-जास्त बाऊन्स पाहायला मिळत आहेत. त्यातच बुमराने टाकलेला शॉर्ट पिच लेंथ चेंडूने एल्गर काहीसा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच पावसानेही हजेरी लावल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला.

दरम्यान, त्याआधी भारताच्या दुसऱ्या डावात मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनं झुंजार फलंदाजी केली. विजयनं २५ धावांची, विराटनं ४१ धावांची, रहाणेनं ४८ धावांची, भुवनेश्वरनं ३३ धावांची, तर शमीनं २७ धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांच्या याच छोट्या छोट्या खेळींनी भारताला दुसऱ्या डावात २४७ धावांचा मोठा इमला उभा करून दिला.