नवी दिल्ली : एरव्ही शौर्याने रोमांचित होणारा दिल्लीचा राजपथ आज मात्र एका घटनेने गहिवरुन गेला. डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसताना राष्ट्रपतींना तुम्ही कधीच पाहिलं नसेल. पण अवघ्या देशानं हे चित्र राजपथावरच्या पथसंचलनाआधी पाहिलं आणि त्याचं कारणही तसंच होतं.
18 नोव्हेंबर 2017... काश्मीरच्या चांदगीर गावात 6 अतिरेकी लपले होते. वायूसेनेच्या गरुड पथकाचे ज्योतिप्रकाश निराला या दहशतवाद्यांना तोंड देत होते. अतिरेक्यांच्या गोळ्यांच्या वर्षावातून माग काढत ज्योतिप्रकाश त्यांच्यावर तुटून पडले. 2 अतिरेक्यांना त्यांनी कंठस्नान घातलं. पण तितक्यात दोन गोळ्या त्यांच्या शरिरात घुसल्या. जखमी निराला यांनी त्याही परिस्थितीत गोळीबार सुरुच ठेवला आणि उरलेल्या चारही अतिरेक्यांना यमसदनी धाडलं.
निराला यांच्या या साहसामुळे मोस्ट वॉन्टेड अतिरेकी उबैद आणि महमूद यांचा खातमा झाला. पण त्याचा आनंद व्यक्त करण्याआधी ज्योतिप्रकाश यांची प्राणज्योत मालवली. 31 व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्याचं भाग्य ज्योतिप्रकाश यांना लाभलं.
आज राजपथावर या वाघाला जन्माला घालणारी आई आणि त्याची पत्नी जेव्हा मंचावर आली तेव्हा राष्ट्रपतीच नव्हे तर अख्खा देश भावूक झाला होता!