मुंबई : रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचं कर्णधारपद विराट कोहलीकडून एबी डिव्हिलिअर्सकडे सोपण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. आयपीएलच्या 12व्या सीजनच्या एबी डिव्हिलिअर्स आरसीबीचा कर्णधार असेल असं बोललं जात होतं, मात्र आरसीबी टीम मॅनेजमेंटने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.


रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, टीमच्या कर्णधार पदाबाबतच्या बातम्या अफवा आहेत. 12व्या सीजनमध्येही आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार आहे.


दक्षिण आफ्रिकेलचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा एबी डिव्हिलिअर्सच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याची अफवा काही दिवसांपासून सुरू होती.


विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीलपासून म्हणजे 2008पासून आरसीबीकडून खेळत आहे. याशिवाय गेल्या सहा सीजनपासून विराट आरसीबीचं नेतृत्व करत आहे. मात्र विराटच्या नेतृत्वात संघाला अद्याप आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधार बदलाच्या अफवा काही दिवसांपासून पसरत होत्या.


विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. सुरेश रैनानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराटने आयपीएलमध्ये 163 सामन्यात 4948 धावा केल्या आहेत.


आरसीबीने आपल्या कोचिंग स्टाफमध्येही बदल केले आहेत. कोच डेनिअल विटोरीच्या जागी गॅरी कर्स्टनला मुख्य कोच म्हणून नियुक्त केलं आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या कर्णधार पदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र विराटच आरसीबीचा कर्णधार राहणार हे टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केलं आहे.