लखनौ : रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लखनौमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात रोहित शर्माने विक्रमांचा डोंगर रचला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला.

रोहितने झळकावलेलं शतक त्याच्या कारकीर्दीतलं चौथं शतक होतं. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज आहे.

टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही रोहितच ठरला. रोहितने कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडून आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

यापूर्वी 62 टी20 सामन्यांमध्ये 2102 धावा करुन कोहली अव्वल स्थानी होता. लखनौतील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला 11 धावांची गरज होती. हा पल्ला गाठण्यासाठी रोहितला 86 सामने लागले.

सर्वाधिक सिक्सरच्या यादीत अव्वल


सर्वाधिक षटकारांच्या यादीत रोहित शर्मा जगात दुसऱ्या, तर भारतात पहिल्या स्थानावर आहे. रोहितच्या नावे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 96 सिक्सर आहेत. आणखी सात षटकार ठोकून तो ख्रिस गेल आणि ब्रँडन मॅक्युलमच्या विक्रमाची बरोबरी करु शकेल.

रोहित शर्माच्या नाबाद शतकामुळे लखनौच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीमध्ये टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 20 षटकांत दोन बाद 195 धावांचा डोंगर उभारला. रोहितने ट्वेन्टी ट्वेन्टीतलं विक्रमी चौथं शतक झळकावताना 61 चेंडूंत नाबाद 111 धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या शतकी खेळीला आठ चौकार आणि सात षटकारांचा साज होता.

रोहितने शिखर धवनच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी विंडीज गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. धवनने 41 चेंडूंत 43 धावांची खेळी उभारली.