मुंबई : टीम इंडिया सध्या एका पोठापाठ एक विजय मिळवत असली तरीही धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला वेळीच आपला फॉर्म सुधारावा लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर टी-20 तिरंगी मालिकेतही रोहितचा खराब फॉर्म कायम आहे. टी-20 तिरंगी मालिकेच्या तीनही सामन्यात रोहित शर्मा एकही मोठी खेळी करु शकला नाही. कालच्या (सोमवार) सामन्यातही रोहित शर्मा अवघ्या 11 धावा करुन माघारी परतला. सुदैवाने मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने लंकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. पण या महत्त्वाच्या सामन्यातही रोहित अपयशी ठरल्याने क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत 'बॅड पॅच' येतो. पण रोहितच्या बाबतीत असा 'बॅड पॅच' अनेकदा आला आहे. त्यामुळे आता रोहितच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, पुढच्या वर्षी विश्वचषक होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ हे विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. सध्या प्रत्येक सामन्यातील कामगिरीवर निवडी समितीचं लक्ष आहे.अशावेळी ज्या खेळाडूंचा फॉर्म खराब आहे त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. टी-20 पेक्षा वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे तसा जास्त वेळ असतो. पण मागील मालिकेतही रोहित शर्मा अपयशी ठरला होता. त्यामुळे रोहितने वेळीच आपला फॉर्म सुधारला नाही तर त्यालाही संघातून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत रोहितचा खेळ पाहाता सर्वांनीच त्याची पाठराखण केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. नुकतंच बीसीसीआयने केलेल्या करारात रोहितला ए प्लस यादीतही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन रोहितला आपल्या खेळात आता तात्काळ बदल करावा लागेल.