लंडन : विराट कोहलीच्या टीम इंडियाने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली.
या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक ठोकून भारताला हा सामना आणि मालिका जिंकून दिली.
रोहितने 56 चेंडूंत अकरा चौकार आणि पाच षटकारांसह शतक साजरं केलं. विराट कोहलीने 43 आणि हार्दिक पंड्याने नाबाद 33 धावांची खेळी उभारली. वन डेमध्ये तीन द्विशतकं ठोकणारा रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहेच, मात्र टी-20 मध्ये तीन शतकं ठोकणारा तो कुलिन मुन्रोनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला नऊ बाद 198 धावांत रोखलं होतं. इंग्लंडने खरं तर दहाव्या षटकातच एक बाद 101 धावांची मजल मारली होती. त्यामुळे या सामन्यात इंग्लंड विक्रमी धावसंख्या उभारण्याची चिन्हं दिसत होती. पण सिद्धार्थ कौलने जोस बटलरला 34 धावांवर, तर दीपक चहारने जेसन रॉयला 67 धावांवर माघारी धाडलं आणि इंग्लंडच्या डावाला ब्रेक्स लागले.
भारताकडून हार्दिक पंड्याने 38 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर सिद्धार्थ कौलने 35 धावांत दोन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2018 10:06 PM (IST)
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -