Rohit Sharma : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (30 नोव्हेंबर) घोषणा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी बीसीसीआयचे उच्च अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी बैठक घेतली आणि संघाला अंतिम रूप दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया तसेच इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा कर्णधार म्हणून T20 मध्ये पुनरागमन करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. मात्र, वनडे कॅप्टन आणि वनडेमध्ये खेळणार की नाही? याबाबत अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे टी-20 चा निर्णय घेतला असला, तरी वनडेचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे.
रोहितने वर्षभरापूर्वी 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो शेवटचा टी-20 खेळला होता. त्यानंतर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर केएल राहुलकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणजेच राहुल एकदिवसीय क्रिकेटचा नवा कर्णधार आणि पुढील विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या योजनेचा एक भाग असू शकतो. याशिवाय संजू सॅमसन आणि रजत पाटीदार यांचेही वनडे संघात पुनरागमन झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, संघाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
या बैठकीत संघावर चर्चा करण्यासोबतच पुढील मोठ्या स्पर्धेच्या टी-20 विश्वचषकाची ब्लू प्रिंटही तयार करण्यात आली. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या काळात दोन्ही संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतीय संघ ६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून, एकदिवसीय मालिका 17 डिसेंबरपासून आणि कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयने 45 खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. विराटने बीसीसीआयला विनंती करत ब्रेक देण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्याची निवड होणार की नाही? याचीही चर्चा सुरुच आहे. कोहलीने वनडे आणि टी-20 मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतच स्थान देऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या