मुंबई : टीम इंडियाचा शिलेदार रोहित शर्मा तब्बल चार महिन्यांनी उजव्या मांडीच्या दुखापतीतून सावरला आहे. विजय हजारे करंडकाच्या साखळी सामन्यात खेळून आपण क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत असल्याची घोषणा रोहितनं ट्विटरवरुन केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितच्या उजव्या मांडीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यानंतर सक्तीची विश्रांती आणि खास व्यायाम घेऊन तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय हजारे करंडकात मुंबईचे आगामी सामने चार आणि सहा मार्च रोजी होत आहेत. त्या सामन्यांमध्ये खेळून रोहित शर्मा आपला मॅच फिटनेस सिद्ध करणार आहे.