कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. मात्र या सामन्यात कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्त्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


अंतिम सामन्यात रोहित शर्मा 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 56 धावांवर बाद झाला. त्यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 6.4 षटकांमध्ये 70 धावांची गरज होती. मात्र संघ व्यवस्थापनाने सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत दिनेश कार्तिकऐवजी विजय शंकरला फलंदाजीसाठी पाठवलं. विजय शंकरची फलंदाजीची मालिकेतली ही पहिलीच वेळ होती.

अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 35 धावांची गरज होती, तेव्हा या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. विजय शंकरने मुस्ताफिजुर रहमानच्या 17 व्या षटकात 5 चेंडूत केवळ एकच धाव काढली. एवढंच नाही, तर याच षटकात मनीष पांडेही बाद झाला. त्यावेळी भारताला 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज होती. त्यामुळे हा सामना भारताच्या जवळपास हातातून गेल्यात जमा होता. मात्र दिनेश कार्तिकने 19 व्या षटकात 22 धावा करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.

दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवलं, याचं उत्तर कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर दिलं. ''अखेरच्या षटकांमध्ये मुस्ताफिजुर गोलंदाजीसाठी येईल हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे कार्तिकसारखा अनुभवी फलंदाज त्याचा सामना करण्यासाठी असावा,'' अशी रणनिती होती, असं रोहित शर्मा म्हणाला.

अगदी त्याचप्रमाणे दिनेश कार्तिकने रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवला आणि अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजय खेचून आणला.

संबंधित बातम्या :

विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू


दिनेश कार्तिकचा विजयी षटकार, तिरंगी मालिका भारताच्या खिशात