मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंतर रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल मोसमातला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएलच्या 11 व्या मोसमाची सुरुवात रिटेन पॉलिसीने झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराटला 17 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं, जी आयपीएल इतिहासातली सर्वात मोठी रक्कम आहे.

दुसरीकडे गतविजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्यासाठी 33 कोटी रुपये खर्च केले. रोहित शर्माला 15, हार्दिक पंड्या 11 आणि बुमरासाठी 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

मुंबईकडे आता लिलावासाठी 2 राईट टू मॅच आणि 47 कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम आणखी कमी होऊ शकली असती, मात्र मुंबई इंडियन्सच्या हितासाठी रोहित शर्माने स्वतःची रक्कम कमी केली.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत घेण्यात रस दाखवला नाही. रोहित शर्माने क्षेत्ररक्षणासोबतच सगळीकडे दमदार कामगिरी केली आहे. तो फलंदाजांचं संतुलन साधण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठीही तयार असतो. आता त्याने संघाला प्राधान्य दिलं असल्याचं संघ व्यवस्थापनाने म्हटलं आहे.

काही वृत्तांनुसार, मुंबईने रोहितला स्वतःची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती, जेणेकरुन संघ आणखी चांगला करता येईल. रोहितने ही मागणी तातडीने मान्य केली. रोहितला जास्त किंमत दिल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून क्रृणल पंड्याला रिटेन केलं जाणार होतं, मात्र रोहितने स्वतःची रक्कम कमी करुन हार्दिक पंड्याला रिटेन केलं.

पॉलिसीनुसार, रोहित शर्मालाही विराट कोहली एवढीच रक्कम मिळाली असती, मात्र त्याने संघाची चांगली बांधणी करता यावी, यासाठी स्वतःची रक्कम कमी केली, जेणेकरुन इतर चांगले खेळाडू घेता येतील.


संबंधित बातमी : धोनी, रैनाचं सीएसकेत कमबॅक, बंगळुरुने गेलला सोडलं