मुंबई : भारताचा सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माला देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्यांच्यासह कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि 2016 पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती मारियाप्पन थांगावेलू यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.


राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या वितरणासंबंधी निर्णय घेण्यासाठी मंगळवारी निवड समिती बैठक घेण्यात आली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. क्रीडामंत्री आता या पुरस्काराला हिरवा कंदिल देतील. एकदा मंत्र्यांनी पुष्टी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुरस्कार प्रदान करतील. रोहित शर्माला हा पुरस्कार मिळाल्यास तो हा पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेटपटू बनेल. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे.


रोहित शर्मासाठी 2019 हे वर्ष सर्वोत्कृष्ट ठऱलं होतं. रोहित शर्माची एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरी चांगली असून त्यांच्या नावे अनेक विक्रमांचीही नोंद आहे. 2019 या वर्षात रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या. रोहित 2019 मध्ये सात शतकांसह 1490 धावा केल्या.


2019 एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य सामन्यात तो भारतासाठी सर्वात मजबूत फलंदाज होता. विश्वचषक मालिकेत रोहितने 648 धावा केल्या. रोहित शर्मानेही या स्पर्धेत विक्रमी पाच शतके ठोकली. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याला आयसीसीचा एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलं होतं.