मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने वन डे आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेची अक्षरशः धुलाई केली. वन डे मालिकेत त्याने कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक आणि टी-20 मध्ये दुसरं शतक पूर्ण केलं. यासोबतच त्याने या वर्षात श्रीलंकेविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडला आहे.

रोहित शर्माने 2017 या वर्षामध्ये श्रीलंकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 38 षटकार ठोकले. त्याने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचाही विक्रम मोडित काढला. गेलने 2012 साली न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये एका वर्षात 33 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता.

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं. भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.