शतकानंतर रोहित शर्माचं पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2018 10:23 PM (IST)
सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही त्याच्या पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं.
पोर्ट एलिझाबेथ : 14 फेब्रुवारीला संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या शिलेदारांनीही आपापल्या शैलीत हा दिवस आपल्या पार्टनरसोबत साजरा केला. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही त्याच्या पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं. पहिल्या चार वन डे सामन्यांमध्ये केवळ 40 धावा करणाऱ्या रोहित शर्माने पाचव्या वन डेत 115 धावांची शतकी खेळी केली. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. सामनावीराची मिळालेली ट्रॉफी त्याने पत्नी रितीका सजदेहला समर्पित केली. इंस्टाग्रामवर रोहित शर्माने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, यापूर्वी रोहित शर्माने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला श्रीलंकेविरुद्धच्या वन डेत द्विशतक ठोकून पत्नीला गिफ्ट दिलं होतं. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतच त्याने वेगवान शतक ठोकलं. हे शतक केलं त्याच्या एक दिवस अगोदरच त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. आता पुन्हा एकदा शतक ठोकत त्याने पत्नीला व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं आहे. पोर्ट एलिझाबेथ वन डेत रोहितने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं. त्याने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली. रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.